मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली असून आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ च्या रिलीजपूर्वीच त्याला थेट व्हॉट्सअॅपवर धमकी देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या धमकीमुळे चित्रपटसृष्टीसह मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर 2’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र याच काळात त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर वॉइस नोटद्वारे गंभीर धमकी देण्यात आली. या वॉइस नोटमध्ये थेट रणवीर सिंहकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी मिळताच रणवीर सिंहने तात्काळ मुंबई पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर काही दिवसांतच रणवीर सिंहला ही धमकी प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या वॉइस नोटच्या आधारे सायबर सेल आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
धमकीची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अतिरिक्त सशस्त्र पोलीस, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. कॉल डिटेल्स, डिजिटल ट्रेसेस आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीतील रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र पोलिसांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून सोसायटी प्रशासनाने यासंदर्भात पोलिसांना पत्र देत आपली भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे रहिवाशांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईतील नामवंत कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रणवीर सिंहला मिळालेली धमकी आणि रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेली फायरिंग या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
दरम्यान, रणवीर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा हे पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून धमकी देणाऱ्या व्यक्तीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.



