यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात पार पडला. शाळेच्या आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि भविष्यातील स्वप्नांची सांगड घालणारा हा कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान शरद जिवराम महाजन यांनी भूषवले होते. यावेळी शिक्षण मंडळाचे असिस्टंट सेक्रेटरी ए. बी. महाजन, आय. टी. आय. चे प्राचार्य गिरीश वाघुळदे, सेमी माध्यमाच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, प्रवीण झोपे सर, पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम तसेच सौ. गौरी भिरूड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी व स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी दिलेले संस्कार, शिस्त, चांगले विचार आणि उज्ज्वल भविष्यासाठी केलेले मार्गदर्शन यांची आठवण काढत विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या क्षणी अनेक शिक्षक भावूक झाले तर विद्यार्थ्यांचेही डोळे अश्रूंनी पाणावले.
यानंतर शाळेच्या आठवणी म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात करिअर घडवण्याचा सल्ला दिला. प्राचार्या सौ. रंजना महाजन यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचे मार्गदर्शन केले.
सेक्रेटरी ए. बी. महाजन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अष्टसूत्र सांगत शिक्षणासोबत सर्वांगीण विकास किती आवश्यक आहे, हे उदाहरणांसह स्पष्ट केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आय. टी. आय. चे प्राचार्य गिरीश वाघुळदे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत ध्येयनिश्चिती करून जीवनात पुढे जाण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात शरद महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना उत्कृष्टतेला प्राधान्य द्या, असे आवाहन केले. आई-वडिलांनी आपल्या प्रगतीसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली.



