चंद्रपूर-वृत्तसेवा | चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. सकाळपर्यंत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका असल्याची चर्चा असताना, दुपारी मात्र ठाकरे गटाने भाजपशी हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली. अवघ्या एका मताने भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले, तर एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्याचा निकालावर परिणाम झाला.

सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती. या बैठकीत ठाकरे गटाने महापौरपदाची मागणी केली, मात्र काँग्रेसकडून त्यास नकार मिळाल्याने बैठक निष्फळ ठरली. नाराज झालेले संदीप गिऱ्हे बैठकीतून बाहेर पडले आणि त्यानंतर काही वेळातच भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली.
भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तेच्या वाटणीचा सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. पहिली सव्वा वर्षे भाजपकडे तर उर्वरित सव्वा वर्षे ठाकरे गटाकडे सत्ता राहणार आहे. उपमहापौरपद ठाकरे गटाकडे राहील, तर काही वर्षांसाठी सभापतीपदही त्यांना देण्यात येणार आहे.
संख्याबळ असूनही काँग्रेस सत्तेबाहेर राहिली आहे. काँग्रेसकडे २७, भाजपकडे २३ आणि ठाकरे गटाकडे ६ नगरसेवक आहेत. विजय वडेट्टीवार यांनी ठाकरे गटाला स्थायी समिती अध्यक्ष व उपमहापौर पदाची ऑफर दिल्याचे सांगितले, मात्र भाजपकडून मिळालेल्या ऑफरमुळे ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी आक्रमक भूमिका आणि दुपारी भाजपला पाठिंबा या घडामोडींमुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, या निर्णयाची चर्चा राज्यभर सुरू आहे.



