Home Cities जळगाव सांडपाणी मिसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महापौरांची मेहरूण तलावकडे धाव

सांडपाणी मिसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महापौरांची मेहरूण तलावकडे धाव


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये गटारीचे सांडपाणी थेट मिसळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या गंभीर बाबीची दखल घेत नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महापालिकेच्या पथकासह आणि नगरसेवकांसह घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सुचना महापौर यांनी दिले आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओने वेधले :
लक्ष गेल्या काही दिवसांपासून मेहरुण तलावात दूषित पाणी जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत होते. मात्र, काल सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. “काल सोशल मीडियामध्ये सांडपाणी तलावात जात असल्याची बातमी आल्यानंतर आम्ही आज प्रत्यक्षात सर्व नगरसेवकांसह या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आहोत,” अशी माहिती महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी दिली.

बैठकांचे सत्र आणि नियोजित उपाययोजना :
या संदर्भात महापौर यांनी सांगितले की, यापूर्वी देखील महापालिकेत या विषयावर प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. आता प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा सविस्तर बैठक आयोजित केली जाणार आहे. या भागातील सांडपाणी तलावात जाण्यापासून कसे थांबवता येईल, यासाठी महानगरपालिका प्रशासन ठोस प्रयत्न करणार आहे. तसेच, या संदर्भात आरोग्य विभागाशी सविस्तर चर्चा करून स्वच्छतेच्या कामांना गती दिली जाणार आहे.

प्रलंबित कामांना मिळणार गती :
गेल्या अडीच वर्षांपासून मेहरुण तलाव परिसरातील अनेक कामे प्रलंबित आहेत. मागील कार्यकाळात अनेक समस्या उद्भवल्याने विकासकामांना खीळ बसली होती. मात्र, आता हे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. तलावाचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पाहणी दौऱ्यावेळी महापौरांसोबत स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे मेहरुण तलावाचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound