मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर कचरा टाकण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अंतुर्ली येथे घडली आहे. या वादात संशयित आरोपींनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर फिर्यादी तरुणी, तिची आई आणि काकू यांचा विनयभंग करून कुटुंबातील पाच जणांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली येथील १९ वर्षीय तरूणीने हिने या प्रकरणी तक्रार दिली आहे. ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तिचे काका संशयित आरोपींना त्यांच्या घरासमोर कचरा न टाकण्याबाबत सांगत होते. मात्र, याचा राग मनात धरून आरोपी शेख वाजीद शेख सादीक, शेख समीर शेख सादीक, शेख साबीर शेख सादीक आणि शेख सादीक शेख करीम (सर्व रा. अंतुर्ली) यांनी फिर्यादीच्या कुटुंबाला घेराव घातला.

संशयित आरोपींनी फिर्यादी तरूणीला, तिच्या आईला आणि काकू अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलांच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. जेव्हा घरातील पुरुष मंडळी मध्यस्थी करायला आली, तेव्हा आरोपींनी हातातील काठ्यांनी डोक्यावर व हातापायावर जबर मारहाण केली. यात हे पाचही जण गंभीर जखमी झाले आहेत. जाताना आरोपींनी ‘तुम्हाला जिवंत मारून टाकू’ अशी धमकीही दिली. तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष्ज्ञ आडसूळ हे करीत आहे.



