Home क्राईम यावल बाजार समिती कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणी पोलिसांना निवेदन 

यावल बाजार समिती कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणी पोलिसांना निवेदन 


यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने फैजपूर येथे पोलिस उपअधिक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. शासकीय कर्मचारी असलेल्या बाजार समिती कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून धमकावल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, बाजार समितीचे कर्मचारी डिगंबर गजानन चौधरी (कनिष्ठ लिपिक), रा. सावदा, ता. रावेर हे दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी खेडाखरेदी फिरस्तीच्या कामावर नियुक्त होते. कर्तव्य बजावत असताना बाजार समितीचे लायसन्सधारक व्यापारी बाळू भास्कर तेली व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बाळू तेली, रा. पाडळसा, ता. यावल यांनी “आमच्या गोदामावर येऊन टोकन द्या” असे सांगून चौधरी यांना बोलावले. टोकन देण्यासाठी चौधरी गोदामावर गेले असता, संबंधित व्यापारी, त्यांचा मुलगा तसेच गोदामावरील हमाल व नातलग अशा एकूण १५ ते १६ जणांनी संगनमताने कट रचून लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. मात्र मारहाणीनंतरही आरोपींकडून “यापुढे आमच्या गाड्यांवर लक्ष ठेवल्यास तुला पाहून घेतले जाईल” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दैनंदिन कामकाज करणे कठीण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक म्हणून कार्यरत असून, समितीने नेमून दिलेली अधिकृत जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यावर संगनमताने जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. व्यापाऱ्यांची अशा प्रकारची दंडेलशाही कायम राहिल्यास भविष्यात बाजार समितीचे कामकाज सुरळीत चालणे अशक्य होईल, अशी चिंता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विपणन) अधिनियम १९६३ मधील कलम ५९(ब) नुसार बाजार समिती कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. संबंधित व्यापारी तसेच मारहाणीत सहभागी इतर १५-१६ व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून योग्य ते शासन करावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या निवेदनावर बाजार समितीचे सचिव, सहाय्यक सचिव, लेखापाल, निरीक्षक, लिपिक, संगणक परिचालक व शिपाई वर्गातील एकूण १५ कर्मचाऱ्यांच्या सह्या असून, सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण बाजार समिती व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

हे.


Protected Content

Play sound