Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकमध्ये उद्या विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिकमध्ये उद्या विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन


नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नागरिकांच्या प्रशासकीय तक्रारींना थेट व प्रभावी मंच उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विभागातील विविध प्रश्नांवर नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता हा विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून, विभागातील सर्व विभागप्रमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील, तर अशा नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात पुन्हा अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांवर उच्चस्तरीय तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या लोकशाही दिनाच्या माध्यमातून महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, आरोग्य, शिक्षण यांसह विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तात्काळ निर्णय किंवा आवश्यक त्या सूचनांचा वर्षाव केला जाईल, अशी माहिती विभागीय महसूल अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे.

दरम्यान, याच दिवशी आणि त्याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी व समस्या शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावीपणे सोडवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना सुरक्षित, न्याय्य आणि सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महिला लोकशाही दिनाचा मुख्य उद्देश आहे.

यापूर्वी तालुका किंवा जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनात अर्ज करूनही ज्यांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही, अशा समस्याग्रस्त व पीडित महिलांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचा टोकन नंबरसह आपले अर्ज सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांनी केले आहे.


Previous articleमंगल मैत्री ग्रुपतर्फे जळगावात रमाई जयंती उत्साहात  
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound