चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने अखेर गावातील महिलांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या महिलांनी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले आणि जोरदार निदर्शने केली.
तळेगाव परिसरात गेल्या जवळपास महिनाभरापासून नळांना पाणी आले नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असून, घरगुती कामे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे यापूर्वी अनेकदा दाद मागूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याने आज महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टाळे उघडणार नाही, असा पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला होता.

केवळ पाणीच नाही, तर गावात नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. गावातील सार्वजनिक महिला शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून, गटारींचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छतेमुळे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गावात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा ठोस आश्वासन मिळालेले नाही. मात्र, या ‘टाळे ठोको’ आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



