
मुंबई-वृत्तसेवा । मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताकारणात ऐतिहासिक बदल घडवत अखेर मुंबईकरांना नवे महापौर मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेत्या आणि अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. यासोबतच उपमहापौरपद शिवसेनेला मिळाले असून, संजय शंकर घाडी यांना उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

मुंबईत भाजपचा महापौर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात या निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे. भाजप आणि शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणूक युतीतून लढवली होती. या निवडणुकीत महायुतीचे एकूण ११८ नगरसेवक निवडून आले असून, त्यात भाजपचे ८९ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक आहेत. बहुमताच्या जोरावर सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याने नेतृत्वाची घोषणा करण्यात आली.
रितू तावडे या भाजपमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. पक्ष संघटनेतील त्यांचा दीर्घ अनुभव, प्रशासनाची जाण आणि महापालिकेतील कामकाजाची सखोल समज पाहता त्या आधीपासूनच महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर होत्या. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत महापौरपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजप नेतृत्वाचा ठाम विश्वास आहे की तावडे यांचे संघटनात्मक कौशल्य आणि अनुभव मुंबईला अधिक सक्षम आणि प्रभावी नेतृत्व देईल.



