जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलने आपली छाप सोडली. विशाल जाधव लिखित आणि निर्देशित ‘काजव्याचे स्वप्न’ हे बालनाट्य अंतिम फेरीत सादर करण्यात आले आणि सांघिक द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला. या बालनाट्याला वैयक्तिक पाच पारितोषिके देखील प्राप्त झाली.
‘काजव्याचे स्वप्न’ हे बालनाट्य महान वैज्ञानिक व नोबेल पारितोषिक विजेते थॉमस अल्वा एडिसन यांच्या जीवनावर आधारित होते. थॉमस एडिसन यांनी दीर्घकाळ टिकणाऱ्या बल्बच्या शोधासाठी केलेले संघर्ष, जिद्द आणि प्रयत्न या सर्व गोष्टी बालनाट्यात प्रभावीपणे सादर करण्यात आल्या. स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून जवळपास ५५ बालनाट्य सादर झाल्या, त्यात ‘काजव्याचे स्वप्न’ने उत्कृष्ट अभिनय, संगीत, रंगभूषा आणि प्रकाशयोजना यासाठी विशेष मान मिळवला.

बालनाट्याच्या वैयक्तिक पुरस्कारांत विशाल जाधव यांना दिग्दर्शन द्वितीय, यतीन पाटील यांना पार्श्व संगीत प्रथम, योगेश लांबोळे यांना रंगभूषा द्वितीय, श्याम चव्हाण यांना प्रकाशयोजना द्वितीय, ओमविलास निकुंभ यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र, तसेच पूर्वा जाधव यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय मधुरा थत्ते यांनी बालनाट्याची निर्मिती केली तर सतीश मालकर, लता निळे, जयश्री सानप, श्रद्धा धर्माधिकारी, कृष्णा सोनवणे, अर्जुन बाविस्कर, सचिन पाटील, अश्विनी पाठक या शिक्षकांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.



