भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने भुसावळ तालुक्यातील काहूरखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळाव्या’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल लावून खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करत उद्योजकतेचा पहिला धडा गिरवला.
उद्योजकतेचा श्रीगणेशा :
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्या लतिका झांबरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक समाधान जाधव, ममता तडवी यांच्यासह पालक आणि बोहर्डी येथील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टॉलवर खवय्यांची गर्दी :
विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलवर चटकदार चाट, फरसाण, गोड मिठाई आणि थंड पेयांची रेलचेल ठेवली होती. केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर हाताने तयार केलेल्या हस्तकला वस्तूंच्या स्टॉलनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वस्तूंची विक्री करताना पैशांचा हिशेब ठेवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि स्वच्छतेचे महत्त्व राखणे, अशा विविध कौशल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला.
आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम :
या उपक्रमाबद्दल बोलताना उपशिक्षक समाधान जाधव यांनी सांगितले की, अशा मेळाव्यांमुळे मुलांमध्ये संघभावना, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टी निर्माण होण्यास मदत होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले, तर मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



