Home राष्ट्रीय देशातील पहिली सहकारी कॅब सेवा ‘भारत टॅक्सी’ सुरू

देशातील पहिली सहकारी कॅब सेवा ‘भारत टॅक्सी’ सुरू

0
103

नवी दिल्ली-वृत्तसेवा | देशातील राइड-हेलिंग क्षेत्रात मोठा बदल घडवत ‘भारत टॅक्सी’ ही देशातील पहिली सहकारी कॅब टॅक्सी सेवा आज अधिकृतपणे सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्ली येथे या सेवेचे उद्घाटन झाले. या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही आणि चालकच या सेवेचे भागीदार व मालक असतील.

सहकारिता मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश चालकांना खासगी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या कमिशन-आधारित मॉडेलमधून मुक्त करणे हा आहे. ‘भारत टॅक्सी’ झिरो-कमिशन तत्त्वावर चालेल. म्हणजेच चालक जेवढी कमाई करेल, ती थेट त्याच्याकडे जाईल. प्रवाशांसाठीही दिलासा देणारी बाब म्हणजे यात सर्ज-प्रायसिंग प्रणाली नसणार असल्याने पीक अवर्समध्येही भाडे स्थिर राहणार आहे.

उद्घाटन सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा चालकांचा (‘सारथी’) सन्मान करण्यात आला. त्यांना कंपनीचे शेअर सर्टिफिकेट देण्यात आले तसेच प्रत्येकी ५ लाख रुपये अपघाती विमा आणि ५ लाख रुपये कुटुंब आरोग्य विमा कव्हर जाहीर करण्यात आले. प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाणाऱ्या चालकांसाठी निवृत्ती बचत योजना आणि ड्रायव्हर सपोर्ट सिस्टीमसारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ही सेवा सदस्यता-आधारित सहकारी मॉडेलवर चालणार असून सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेद्वारे संचालन केले जाईल. सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडून पुढील दोन वर्षांत देशातील प्रमुख शहरांमध्ये सेवा विस्तारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये चालकांसाठी सपोर्ट सेंटरही सुरू करण्यात आले आहेत.

‘भारत टॅक्सी’चे अॅप ओला-उबरसारखेच असेल आणि ते हिंदी, मराठी, गुजराती व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. महिला चालकांसाठी विशेष प्रशिक्षण व विमा योजना राबवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच, चालक-हिताला प्राधान्य देणारे आणि प्रवाशांना परवडणारे दर देणारे पर्याय म्हणून ‘भारत टॅक्सी’कडे पाहिले जात आहे.


Protected Content

Play sound