Home क्राईम घरातून हाकलल्याचा राग; पत्नीच्या डोक्यात घातला दगड !

घरातून हाकलल्याचा राग; पत्नीच्या डोक्यात घातला दगड !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीवर दगडाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी छायाबाई शांताराम गांगुर्डे (वय ३५ वर्षे, रा. वलठाण, ता. चाळीसगाव) आणि आरोपी शांताराम धोंडीराम गांगुर्डे (रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव) हे पती-पत्नी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून छायाबाई यांनी आपल्या पतीला घरातून हाकलून दिले होते. या गोष्टीचा राग शांताराम याच्या मनात होता.

४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास, वलठाण येथील पंडित सुर्यभान पवार यांच्या घराच्या ओसरीत ही घटना घडली. आरोपी शांताराम हा दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला आणि त्याने छायाबाई यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने ओसरीत पडलेला एक दगड उचलून थेट छायाबाई यांच्या डोक्यावर मारला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर जखमी छायाबाई यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी शांताराम गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


Protected Content

Play sound