पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा ते जळगाव रोडवर खेडगाव जवळ एका भरधाव कारने दोन मोटारसायकलींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सुनील फकीरा चौधरी (वय ४६, रा. पाचोरा) यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास आदित्य ग्रो ठिबक कंपनीसमोर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील चौधरी हे त्यांच्या पत्नी सोनीबाई यांच्यासह मोटारसायकलने (क्र. MH 19 BF 0642) शिरसोली येथे जात असताना, समोरून येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने (क्र. MH 12 UN 8152) त्यांना जोरदार धडक दिली. कार चालकाने रॉग साईडला येऊन आधी चौधरी यांच्या गाडीला आणि नंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दुसऱ्या गाडीवरील चालक तुकाराम पाटील हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश पाटील अधिक तपास करत आहेत.



