Home राजकीय ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

‘लाडकी बहीण’ योजनेच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान


मुंबई -वृत्तसेवा । राज्यातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर केला होता. या मागणीला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला आणि या विषयावर सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत दिले.

फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या नावाबाबत सध्या विविध सामाजिक आणि राजकीय स्तरांतून अनेक मागण्या आणि प्रस्ताव येत आहेत. या सर्व प्रस्तावांचा शासन स्तरावर सखोल विचार केला जाईल आणि महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर योग्य तो सन्मानजनक निर्णय घेतील.

आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, अजित पवार हे राज्यातील महिलांचे लाडके नेते होते आणि त्यांच्याच संकल्पनेतून आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या आर्थिक नियोजनामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली गेली. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयामध्ये या योजनेने मोलाची भूमिका बजावली असून, अजित पवार यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची ही खरी पावती ठरेल.

२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, त्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांना विविध माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेला त्यांचे नाव देण्याचा आग्रह धरला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नामांतराची प्रक्रिया ही केवळ राजकीय नसून ती भावनांशी जोडलेली आहे, त्यामुळे सर्व पुरावे आणि तांत्रिक बाबी तपासून तसेच मित्रपक्षांशी चर्चा करून सहमतीनेच पुढील पाऊल उचलले जाईल.


Protected Content

Play sound