Home Cities जळगाव मास्टर कॉलनीतील ‘बुध बाजार’ वादाच्या भोवऱ्यात; आज बाजार बंद

मास्टर कॉलनीतील ‘बुध बाजार’ वादाच्या भोवऱ्यात; आज बाजार बंद

0
152


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनी परिसरात दर बुधवारी भरत असलेल्या जुन्या कपड्यांच्या बाजारावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आजचा बाजार बंद ठेवण्यात आला. रहिवासी, दुकानदार आणि मनपा प्रशासन यांच्यातील संभ्रमामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी या बाजारातील काही दुकानदार व घरमालक यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर परिसरातील काही रहिवाश्यांनी २ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत हा साप्ताहिक बाजार बंद करण्याची मागणी केली होती. बाजारामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि गैरसोयी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर आज सकाळी सुमारे ७ वाजता संबंधित ठिकाणी दाखल झाले. मात्र, त्या वेळी काही स्थानिक रहिवाश्यांनीच या बाजाराचा कोणताही त्रास नसल्याचे सांगत वेगळाच पवित्रा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

या परिस्थितीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण निर्मूलन अधीक्षकांनी उपस्थित नागरिकांना आपली बाजू लेखी स्वरूपात आयुक्तांकडे मांडण्याचा सल्ला दिला. अंतिम निर्णय प्रशासनाकडूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound