
पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शेवगे आणि मुंदाणे शिवारातून अज्ञात चोरट्यांनी पाच शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या मोटारी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ३० जानेवारीच्या सायंकाळी ६ ते ३१ जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण सजन पाटील (वय ४०, रा. शेवगे) यांचे शेवगे आणि मुदांने शिवारात शेत आहे. चोरट्यांनी त्यांच्या शेतातील १२ हजार रुपये किमतीची इकोझेन कंपनीची मोटार आणि वायर चोरून नेली.याव्यतिरिक्त शेजारील शेतकरी शेख शरीफ शेख यासीन यांची १० हजार रुपयांची रोटोसोल कंपनीची मोटार, दिनकर कौतिक पाटील यांची १२ हजार रुपयांची क्रॉप्टन कंपनीची व ४ हजार रुपयांची मेगा कंपनीची मोटार, तसेच सिंधुबाई हरी पाटोळे यांची १२ हजार रुपयांची मोटार, असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक निलेश साळुंखे करत आहेत.



