
शेतीचे नवतंत्र – बहुमाध्यमे वापरामुळे
केळी उत्पादकांच्या जीवनशैलीत बदल

जळगाव जिल्ह्यात आजही केळी हे प्रमुख पीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदरपासून जळगाव जिल्हा केळी उत्पादक मानला जातो. इंग्रजांच्या काळात मुंबई – दिल्ली दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेतून जळगाव जिल्ह्यातील कोचूर (ता. रावेर) येथील केळी दिल्ली रेल्वेस्थानकात पोहचली आणि तेथे ‘कचोरी केळी’ म्हणू प्रसिद्ध झाली. आज एक शतकाचा कालावधी उलटला तरी देशभरात जळगावची केळी ‘जीआय मानांकन’ मिळवून प्रसिद्ध आहे. गेल्या अर्ध शतकात जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे राहणीमान वाढत्या केळी उत्पादन – उत्पन्नातून बदलले आहे. यासाठी केळी लागवडीचे नवतंत्र आणि माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यमांचा वापर केळी उत्पादक करीत आहे. केळी उत्पादकांच्या राहणीमान – जीवनशैली – शेतीचे उपयुक्त नवतंत्रज्ञान आणि बहुमाध्यमांचा वापर यासंदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या अंतर्गत ज्येष्ठ पत्रकार डाॅ. दिलीप तिवारी यांनी संशोध केले आहे. त्यांच्या संशोधनाचा ८९० पानांचा शोधप्रबंध ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ हा आहे. या शोधप्रबंधाचा सारांश ‘मी आणि माझं संशोधन’ या सदरातून Live Trend च्या वाचकांसाठी उद्यापासून १० भागांमध्ये प्रसारित करीत आहोत. या भागांमधून वाचकांना शेतीचे नवतंत्र आणि त्याचा वापर, शेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यमांचा वापर आणि केळीच्या उत्पादन – उत्पन्न वाढीनंतर शेतकऱ्यांची जीवनशेली कशी बदलली याची माहिती होणार आहे. या संशोधन कार्याचे मार्गदर्शक आहेत ‘कबचौउमवि’ तील सेवानिवृत्त प्रा. डाॅ. सुधीर भटकर. सदराचा लोगो ‘मृदंग इंडिया’ चे अनंत भोळे यांनी तयार केला आहे …
‘मी आणि माझे संशोधन’ या विषयावर लेखन करताना ‘… अगोदर मी काय होतो आणि आज मी काय आहे ?’ हे समजून घेणे आवश्यक आहे. संशोधन विषयाचे कार्य अत्यंत परिश्रमाने पूर्ण करणे आणि स्वतः समजून – उमजून घेत सावधपणे ८९० पेक्षा जास्त पानांच्या संशोधन प्रबंधााचे लेखन करणे याचे ‘बीज’ हे मूलतः माझे बालपण, एकत्रित कुटुंब, परिघाच्या बाहेरील शिक्षण, सतत बेभरवशाची पण प्रतिष्ठा देणारी नोकरी, थोडा फार समाजिक कार्यात सहभाग अशा अनुभवातून माझ्यात रुजले, अंकुरले आणि वाढले. आयुष्यातील जवळपास ३४ – ३५ वर्षांची ही प्रक्रिया समजून घेणे, माझ्यातील ‘मी’ समजून घेणे आवश्यक आहे. ते समजून घेतल्यानंतरच माझ्या संशोधनाच्या विषयात शेती – केळी, बहुमाध्यमे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान हे तीन विषय का आणि कसे ? आले हे क्रमाने स्पष्ट होत जाईल. खरे तर हे तीनही विषय स्वतंत्रपणे संशोधन करण्याचे आहेत. मात्र मला तिघा विषयांचा एकत्रित अभ्यास करावा लागला, कारण माझ्यातील ‘मी’ चा प्रवास या तीनही विषयांना आधीपासून स्पर्श करणारा आहे.
माझा जन्म भडगाव येथील तिवारी कुटुंबातला. आई श्रीमती मनोरमा गृहिणी. १३ सदस्यांच्या खटल्याच्या घरातील थोरली सून. वडिल स्व. केशवलाल न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेत हिंदी – इंग्रजी विषयाचे शिक्षक. आजी शेवंताबाई निरक्षर. आजोबा भाऊलाल चौथी उत्तीर्ण. त्यांच मूळ व्यवसाय शेती होता. मात्र अंगीभूत उपजत कौशल्यातून आजोबांनी वाहनचालक, सायकल – मोटारसायकल दुरूस्ती करणारे, अनुभव – निरीक्षणातून पाण्यासाठी डिझेलपंप चालवणारे असे व्यवसाय सुद्धा केले. मला चार काका रमेश, अॅड. प्रकाश, जवाहर आणि स्व. शेखर, पाच आत्या श्रीमती मथुरा, स्व. निर्मला, श्रीमती सुशीला, स्व. दुर्गा आणि स्व. सरला. आईच्या माहेरातून नानी, तीन मामा, तीन मावश्या. आम्हा नातवांसह भडगावचे एकत्रित कुटुंब २५ जणांचे होते. या सर्वांमध्ये मी तिसऱ्या पिढीतला थोरला नातू.

आजोबा राजकारण व समाजकारणातही होते. ते भडगावचे सरपंच होते. पाचोरा तालुका शिक्षण संस्था, भडगाव शेतकरी संघ, गिरणा फ्रूट सेल सोसायटीचे पदाधिकारी होते. आजोबांची पिंपळगाव रस्त्याला लागून ३० एकर बागायती आणि वाक – वडधे शिवारात पाटाच्या पाण्यावरील १२ एकर शेती होती. आजोबांनी मॅटेडोरच्या माध्यमातून भाडोत्री मालवाहू वाहनाचा व्यवसाय केला. काही काळ शेतात गुऱ्हाळ सुद्धा होते. मुलांसाठी कृषी सेवा केंद्र, किराणा दुकान, प्रिंटींग प्रेस, कोल्ड्रिंक शाॅप असेही व्यवसाय आजोबांनी सुरू केले. मी आजोबांसोबत वयाच्या २१ वर्षांपर्यंत होतो. लहानपणी आजोबांच्या सोबतीने ॲम्बेसिडर कारमधून शेतात जात असे. घरी मिनी राजदूत (बाॅबी चित्रपट फेम) दुचाकी होती. शेतीसाठी दोन बैलगाड्या आणि गोठ्यात दुभत्या गाई-म्हशी होत्या. आजीने अनेकवेळा गाईचे धारोष्ण दूध ग्लास भरून दिल्याचे मला आठवते.
शेती कशी करतात ? याचे बाळकडू घरातून कृतिशील पद्धतीने मिळाले. शेत फणसने, वखरणे, नांगरणे, वरम तयार करणे, बारे तयार करणे, पेरणी, कोळपणी, निंदणी, कापणी, काढणी, खळ्यात पाल टाकणे, बैलांची पात चालवणे, ज्वारी – बाजरी मळणी यंत्राचा वापर (थ्रेशर) करणे या सर्व क्रियांशी माझा जवळून आणि क्रियेत सहभागाचा संबंध आला. पेरणीच्या वेळी पांभरवर वजन म्हणून मला आजोबांनी बसविले आहे. रात्री – अपरात्री पाटात पाणी आल्यानंतर जवाहर काका व सालदारांच्या सोबत पूनम बॅटरी, चहा – साखरेच्या पुड्या, जरमनचे भांडे, बाटलीत दूध घेऊन गव्हाला, कपाशीला पाणी भरायला जाण्याची लगबग अनुभवली आहे. ‘बारे धरणे काय असते ?’ हे तेव्हा पासून मला कळते. आंब्याच्या झाडावर कच्च्या कैरीत निसर्गतः पिकेलेली ‘शाक’ दिसली तर कैरी उतरवायची वेळ आली हे तेव्हा आजोबांनी समजावून दिले. आमच्या शेतात आंबराई होती. शंभरवर झाडे होती. त्यात निलम, कलमी, तोतापुरी, लंगडा, गावरान, हापूस असे आंब्याचे प्रकार होते. केळी बाग दरवर्षी असे. मृग बाग, कांदे बाग हे प्रकार आधीपासून माहित होते. केळी लागवडीसाठी खोडवा पाहायला आजोबांच्या सोबत ॲम्बेसिडर गाडीने तालुक्यात फिरायचो. आजोबांनी पपई लागवड केली. ‘टेपिओका’ नावाचे नवे पीक लावले होते. आजोबांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे ‘प्रगतशील शेतकरी’ पुरस्कार मिळाले होते.
आजोबा शाहीर सुद्धा होते. त्याचे एक छायाचित्र आजही घरात आहे. फेटा बांधलेला, जाकिट घालून त्यावर शाहिराचा बिल्ला असा तो फोटो आहे. माझे वडील कवी होते. ‘जीवनधार’ हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. मी सुद्धा काही काळ कविता केल्या. माझा आत्येभाऊ मिलिंद (रा. पारोळा) हा सुद्धा कविता रचत असे. वत्कृत्व आणि लेखनाचा वारसा आजोबा, वडील यांच्याकडून मला मिळाला.
माझे शालेय व दहावी – बारावीचे शिक्षण भडगावला झाले. दहावीत ६७ टक्के गुण होते. बारावीत विज्ञान शाखेत गणितात ‘गच्चा’ झाला. शेवटी दहावीचे गुण आणि चित्रकलेची इंटर इमिडिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण या पात्रतेमुळे छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील शासकीय कला महाविद्यालयात १९८४ ला मी प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम वडील केशवलाल यांनी सूचविला. चित्रकलेच्या शिक्षणाला मी जाणार हे स्वप्नातही पाहिले नव्हते. पायाभूत वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर बी. एफ. ए. (जाहिरात कला) या शाखेचे शिक्षण मी घेतले. महाविद्यालयात वर्गाचा सीआर, महाविद्यालयाचा जीएस आणि मराठावाडा विद्यापिठात यूआर होण्याची संधी मला मिळाली. अभ्यासक्रम चित्रकलेशी संबंधित होता. त्यात माझा स्पेशल सब्जेक्ट ‘इलस्ट्रेशन’ व सब्सिडरी सब्जेक्ट ‘फोटोग्राफी’ होता. ‘शाकम’ मधील अनुभव लेखन हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. १९८९ मध्ये मी पदवी उत्तीर्ण झालो. महाविद्यालय व मराठवाडा विद्यापिठात (तेव्हा नामांतर झालेले नव्हते) पहिला आलो. या अभ्यासक्रमात ‘जाहिरात कला आणि कल्पना’ हा लेखी विषय होता. त्यात पत्रकारितेशी आणि जनसंवादाशी संबंधित प्रकरणे होती.

बी. एफ. ए. पदवी महाविद्यालय आणि विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. काही काळ प्रकाश काकांच्या प्रिंटीग प्रेसमध्ये कंपोझिटर व बाईंडर म्हणून काम केले. ‘सुजाणशक्ती’ नावाचे साप्ताहिक काका प्रसिद्ध करीत. दैनिक ‘सकाळ’च्या नाशिक आवृत्तीत प्रेस फोटोग्राफर व बातमीदार भरायचे असल्याची जाहिरात दैिनकात वाचली. मी अर्ज केला. नाशिक येथे तेव्हाचे पुणे आवृत्तीचे संपादक विजय कुवळेकर, नाशिक आवृत्तीचे संपादक द्वारकानाथ लेले, व्यवस्थापक भागवत यांनी मुलाखत घेतली. बातमी लेखनाचा मला अनुभव नव्हता. पण फोटोग्राफी करतो हे जास्तीचे क्वालिफिकेशन उपयुक्त ठरले. १९८९ मध्ये अवघ्या ६५० रुपये महिना मानधनावर पत्रकारितेत पहिले पाऊल टाकले. बातमी लेखन, संपादन शिकत गेलो. गरजेच्यावेळी प्रेस फोटोग्राफीचे काम केले. मध्यंतरी उत्तम कांबळे हे दैनिकाचे संपादक झाले. त्यांनी पत्रकारितेतील अभ्यास, चिकाटी, सातत्य हा संस्कार दिला. १९९१ मध्ये नाशिकचा कुंभमेळा केला. बातमी सोबत नावाने फोटो पान १ वर आठ काॅलम प्रसिद्ध झाल्याच्या अनुभव मी घेतला. वृत्तमालिका लेखन अंतर्गत ‘कुंभमेळ्यातून’ सदर लिहिले. नाशिक आवृत्तीत ‘एक गाव एक पुरवणी’ हा संपादकीय आणि व्यावसायिक उपक्रम केला. चांदोरी (ता. निफाड) या पुरवणीला महाराष्ट्र शासनाचा ‘विकासवार्ता पुरस्कार’ (१९९१) मिळाला.
नंतर जळगावला कार्यालय बातमीदार म्हणून बदली झाली. ‘फसवी साग लागवड योजना’ यावर लिखाण केले. दैनिक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचा ‘शोध पत्रकारिता पुरस्कार’ (१९९३ -१९९४) मिळाला. जळगाव येथे १९९१ – १९९२ मध्ये सुरेशदादा जैन व जिल्हा प्रशासनात संघर्ष झाला. यानंतर कथित ‘लैंगिक छळ प्रकरण’ गाजले. या विषयाशी संबंधित बातम्यांचे वस्तूनिष्ठ लेखन केले म्हणून पुणे ‘सकाळ’ चा ‘डाॅ. ना. भि. परूळेकर पुरस्कार’ (१९९४) मिळाला. नंतर काही काळ पुन्हा नाशिक, जळगाव आणि अकोला (२००३) येथे मुख्य उपसंपादक आणि कार्यालय प्रमुख म्हणून काम केले. अकोला कार्यालयात व्यावसायिक व जाहिरात पुरस्कृत पुरवण्या केल्या. २००६ मध्ये दैनिक ‘सकाळ’ च्या खान्देश आवृत्तीसाठी जळगाव येथे सहयोगी संपादक झालो. या पदावर असताना खूप नवे उपक्रम राबविले. महिलांसाठी पुरस्कार योजना सुरू केली. दिवाळी अंक मासिक स्वरूपात काढला. ‘ग्राम विकास’ विषयावरील अंकाला बुलढाणा येथील ‘तुका म्हणे’ संस्थेचा ‘सुशीलादेवी कदम पुरस्कार’ (२००८) मिळाला. दैनिकात दर रविवारी ‘दखल’ सदर लिहिले. त्याचे संकलन असलेल्या ‘दखल’ पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा ‘कृष्णराव भालेकर पुरस्कार’ (२०१०) मिळाला. याच दरम्यान दैनिक ‘सकाळ’ सोडून दैनिक ‘देशदूत’ मध्ये प्रवेश केला. नाशिक – जळगावला सहाय्यक संपादक म्हणून काम केले. ‘देशदूत’ च्या जळगावमध्येही महिलांसाठी पुरस्कार योजना सुरू केली. जळगाव जिल्ह्यातील १२०० विद्यार्थ्यांना विधी मंडळ दाखविण्यासाठी मुंबईला नेले. हा बहुचर्चित व महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सन २०१४ मध्ये दैनिक ‘तरूण भारत’ च्या जळगाव आवृत्तीत मुख्य संपादक झालो. पावणे दोन वर्षे त्या पदावर होतो. या काळात ‘वसुंधरा ग्रीन जर्नालिस्ट सन्मान’ (२०१५) मिळाला.
पत्रकारितेतील हा धावता प्रवास १९८९ पासून २०१६ पर्यंत सुरू होता. मात्र पत्रकारितेच्या कामाचे कोणतेही शिक्षण मी घेतलेले नव्हते. बातमीदार ते संपादक पदावर पोहचलेलो असल्यामुळे तशा शिक्षणाची गरज मला वाटत नव्हती. मध्यंतरी २०१३ मध्ये तेव्हाच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात एम. ए. (जनसंवाद व पत्रकारिता) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दैनिकाची कामे – जबाबदारी सांभाळत अभ्यासक्रम पूर्ण केला. विभाग प्रमुख प्रा. डाॅ. सुधीर भटकर प्रा. विनोद निताळे होते. त्यांनीच वेळोवेळी अभ्यासक्रम पूर्ण करायला प्रोत्साहन दिले. या अभ्यासक्रमात विद्यापिठात पहिला आलो, ‘स्व. गिरधर नेहते सुवर्णपदक’ (२०१५) मिळाले. मध्यंतरी मुळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता अभ्यासक्रमात अध्यापनाचे कार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापिठात पहिला आणला. सन २०१६ पासून पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालो. सोशल मीडियात काही मान्यवरांच्या ब्लाॅगसाठी कण्टेण्ट लेखन हे काम व्यवसाय म्हणून केले. तेव्हा ‘कण्टेण्ट क्रिएटर’ शब्द फारसा प्रचलित नव्हता. याच धावपळीत सन २०१९ पासून पीएच. डी. साठी प्रयत्न सुरू केले.
पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आताचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी माझे पत्रकार म्हणून वेगळे ऋणानुबंध जुळले आहेत. विद्यापिठाच्या स्थापनेच्यावेळी पहिले कुलगुरु प्रा. डाॅ.निंबा कृष्णा ठाकरे सर होते. त्यांनी विद्यापिठाच्या उभारणीसाठी प्रचंड मेहनत घेतली. अक्षरशः रोजंदारीने सहकारी गोळा केले. इमारती उभ्या करताना त्या हवामान, निसर्गाशी कशा पूरक असतील ? याचा सतत विचार केला. तेव्हा मी जळगावला दैिनक ‘सकाळ’ चा कार्यालयीन बातमीदार होतो. ‘विद्यापीठ उभारणीच्या सकारात्मक बातम्या द्या. आज अडचणी भरपूर आहेत, त्या दैिनकात लिहू नका. भविष्यात त्याचाच त्रास गुणवत्तेसाठी होईल,’ असे एकेदिवशी ठाकरे सरांनी समजावले. तशीची भूमिका मी निभावली. विद्यापीठ उभे राहीले, आज धावते आहे. नंतरचे कुलगुरू प्रा. डाॅ. के. बी. अण्णा पाटीलसरांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध झाले. त्यांच्या कार्यकाळात विद्यापिठाने अभ्यासक्रम बदलावर चर्चा केली. तेव्हा मी दैनिक ‘सकाळ’ खान्देश आवृत्तीचा सहयोगी संपादक होतो. अभ्यासक्रम बदलासाठी दैनिकात मान्यवरांच्या लेखांची मालिका ६२ दिवस सुरु होती. याचाच विचार करून पाटील सरांनी अभ्यासक्रम बदल ‘मंथन सभेत’ मला मत मांडण्याची संधी दिली. तसे बोलावणे असलेला मी एकमेव पत्रकार होतो. पुढील काळात विद्यापिठातून मी एम. ए. (जनसंवाद व पत्राकारिता) पदवी सुवर्ण पदक घेऊन उत्तीर्ण झालो. मध्यंतरी कुलगुरू प्रा. डाॅ. पी. पी. पाटील यांच्या सहकार्यामुळे मला ‘पेट परीक्षा’ न देता पीएच. डी. ला थेट प्रवेश मिळाला. केळीशी संबंधित विषयात पीएच. डी. मिळाल्यानंतर कुलगुरू प्रा. डाॅ. विजय माहेश्वरी व प्र कुलगुरू प्रा. डाॅ. एस. टी. इंगळे यांच्या नेतृत्वात तयार होणाऱ्या ‘केळी निर्यात व्यवस्थापन अभ्यासक्रम’ रचनेच्या ‘मंथन समितीत’ मला सहभागी होता आले. असे योगायोग आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याचे धैर्य देत असतात.

लेखनाच्या पहिल्या भागात पीएच. डी. पदवीशी संबंधित संशोधन कार्याविषयी स्पष्टीकरण द्यायला हवे. ते म्हणजे, पीएच. डी. पदवी मिळविणे म्हणजे, ‘डाॅक्टर ऑफ फिलासाॅफी’ पदवी मिळविणे. निश्चित केलेला एक मुख्य विषय आणि त्याच्याशी संबंधित उप विषयांचा अभ्यास करून निश्चित केलेल्या गृहितकांची पडताळणी करून नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणे. ‘डाॅक्टर ऑफ फिलासाॅफी’ आणि ‘डाॅक्टरेट ऑफ फिलासाॅफी’ यात खूप फरक आहे. डाॅक्टर ऑफ फिलासाॅफी म्हणजे पीएच. डी. पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी होऊन विद्यापिठात अभ्यास करणे. हा अभ्यास नव्या विषयाच्या अस्तित्वाचा (Metaphysics) (म्हणजे, मागील वास्तव काय आहे आणि नवे काय शोधायचे आहे ?) याचा अभ्यास करणे. नवे ज्ञान (Epistemology) मिळविण्यासाठी (म्हणजे, विषयाच्या विविध मर्यादांचा) अभ्यास करणे. विषयाशी संबंधित नवे नीतिशास्त्राचा (Ethics) (म्हणजे, योग्य – अयोग्य, चांगले – वाईट) अभ्यास करणे. नवे तर्कशास्त्र (Logic) (म्हणजे योग्य युक्तिवाद आणि विचारांचे नियम) मांडणे, एखाद्या विषयातील सौंदर्यशास्त्राचा (Aesthetics) (म्हणजे विषयाचे स्वरुप, अर्थ, मूल्य, रंजकता, उत्सुकता, कला, सौंदर्य) याचा अभ्यास करणे. डाॅक्टरेट ऑफ फिलासाॅफी ही पदवी नाही. हा सर्वोच्च संस्था – शिक्षण संस्था यांनी एखाद्या व्यक्तिच्या विविध क्षेत्रांतील अनुभव, कार्य याचा डाॅक्टरेट प्रदान करीत केलेला सन्मान आहे. डाॅक्टर ऑफ फिलासाॅफी ही पदवी मिळवावी लागते. डाॅक्टरेट ऑफ फिलासाॅफी हा सन्मान प्रदान केला जातो.
( पुढील भाग – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता …)



