Home Cities जळगाव पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प – डॉ. केतकी पाटील

पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प – डॉ. केतकी पाटील


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा ठरला आहे. मागील काही वर्षांतील धोरणांचा पुढचा टप्पा म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात सामाजिक विकासासोबतच संरक्षण क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. मागील अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेल्या ‘लखपती दीदी’ योजनेला पुढे नेत २०२६ च्या अर्थसंकल्पात महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध विक्री केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे.

विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच, महिलांच्या आरोग्य सेवांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महिलांसाठी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे मातृत्व आरोग्य, स्त्रीरोग आणि सर्वसामान्य उपचार अधिक सुलभ होतील.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. यंदाचे बजेट विशेषतः भांडवली खर्चावर केंद्रित असून, नवीन शस्त्रास्त्रे, आधुनिक उपकरणे आणि प्रगत प्लॅटफॉर्मच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले आहे. ड्रोन तंत्रज्ञान, लढाऊ विमाने, अत्याधुनिक तोफखाना, नौदल जहाजे तसेच सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस स्पष्टपणे दिसून येतो.

महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प भविष्यातील भारताला अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound