भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात शोकाकुल शांतता असूनही, उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा आदराने उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या श्रद्धांजली सभेस सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, उमेश नेमाडे, संतोष भाऊ दाढी, रवींद्र नाना पाटील, आशिक राजू सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, मनोज बियाणे, उल्हास पगारे, जगन सोनवणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच व माजी सरपंच यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

सभेत विविध सामाजिक संघटना, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, क्रीडा संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना तसेच व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वच स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ही सभा सर्वसमावेशक आणि भावनिक ठरली. वक्त्यांनी आपल्या भाषणातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांचे, जनतेशी असलेल्या नात्याचे आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहर व तालुक्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सभेचे आयोजन केले होते. पक्षाच्या वतीने अजितदादा पवार यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.



