फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा २०२५-२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत झालेल्या या स्पर्धांनी क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे अध्यक्षस्थानी होते, तर तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. मिलिंद शंकर वाघुळदे (बापुदादा) यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. पदमाकर पाटील उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून सॉफ्टबॉल खेळातील छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री किशोर चौधरी व जयेश मोरे यांची उपस्थिती लाभली.

या स्पर्धेस संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. ए. के. पाटील, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ. अरविंद कांबळे, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, श्री दीपक आर्डे, श्री योगेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार व एरंडोल येथील चार पुरुष व चार महिला संघांनी सहभाग नोंदविला.
उद्घाटनप्रसंगी मा. श्री. मिलिंद वाघुळदे यांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधता येतो, त्यामुळे निर्णयक्षमता विकसित होते आणि संघभावना वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळात सहभागी होऊन आपली क्षमता ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर राज्य व देशपातळीवर महाविद्यालयाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
स्पर्धेच्या निकालात सॉफ्टबॉल पुरुष गटात जळगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला, एरंडोल द्वितीय, धुळे तृतीय तर नंदुरबार चौथ्या स्थानी राहिला. महिला गटातही जळगाव संघाने प्रथम क्रमांक मिळविला, एरंडोल द्वितीय, नंदुरबार तृतीय आणि धुळे चौथ्या क्रमांकावर राहिले. विजयी संघांतील खेळाडू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे सहभागी होणार आहेत.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या पंचांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ए. के. पाटील, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर व राजेंद्र ठाकुर यांनी विशेष परिश्रम घेतले.



