सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील ‘अलाईफ फिटनेस जिम अँड हेल्थ क्लब’चे नाव आता राज्यस्तरावर गाजले आहे. मुंबईतील कलवा येथे पार पडलेल्या मानाच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावद्याचे सुपुत्र संतोष विजय तायडे यांनी आपल्या ताकदीची चुणूक दाखवत दुहेरी यश संपादन केले आहे.

पदकांवर कोरले नाव :
पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया’शी संलग्न आणि ‘वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग फेडरेशन, लंडन’ कडून मान्यताप्राप्त होती. या अटीतटीच्या स्पर्धेत संतोष तायडे यांनी ८३ किलो मास्टर्स–१ गटात तृतीय क्रमांक (कांस्य पदक) पटकावला, तर डेडलिफ्ट प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) मिळवून सावदा शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

खास आकर्षण :
मुंबई पोलिसांसोबत पोडियम शेअर या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, संतोष तायडे यांनी मुंबई पोलीस दलातील मनोज मोरे यांच्यासोबत पोडियम शेअर केला. हा क्षण जिम परिवारासाठी आणि सावदाकरांसाठी अत्यंत अभिमानाचा ठरला आहे.
यशाचे श्रेय मार्गदर्शनाला :
राम मंदिर समोर असलेल्या अलाईफ फिटनेस जिमचे मालक आणि प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक अर्जुन ठाकूर यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली संतोष तायडे यांनी हे यश मिळवले आहे. अर्जुन ठाकूर यांनी संतोष तायडे यांच्यावर घेतलेली मेहनत आणि तायडे यांची चिकाटी यामुळेच हे यश शक्य झाल्याचे जिम परिवाराकडून सांगण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण सावदा परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



