जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन “वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण” या राष्ट्रीय थीमनुसार गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रेरणादायी विचारांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला.
२६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांच्यासह फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील यांचे आगमन बँड पथकाच्या गजरात झाले. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध आणि आकर्षक पथसंचलनाने उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या ठेक्यावर साकारलेले पथसंचलन आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली एकात्मिक कलाकृती हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.
यानंतर गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आपले विचार मांडले. देशभक्तीपर गीते, नृत्याविष्कार आणि प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक व घटनात्मक महत्त्व विशद करणाऱ्या भाषणांद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवले.
कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या शैक्षणिक यशाचा विशेष उल्लेख केला. क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या आधुनिक व भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचेही त्यांनी अभिनंदन केले. आगामी काळात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिक विकास होऊन अमूलाग्र बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जागतिक पातळीवरील घडामोडींचे भान, सर्वांगीण ज्ञानाचे महत्त्व, शिस्तीचे पालन आणि नियमित व्यायामाचे फायदे अधोरेखित केले. भारत हा सार्वभौम देश असून संविधानामुळे नागरिकांना मिळालेल्या हक्कांचे आणि कर्तव्यांचे महत्त्व त्यांनी प्रभावी शब्दांत स्पष्ट केले.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. “वंदे मातरम” या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला आणि उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.



