Home Cities पारोळा पारोळ्यात ग्रंथालय संघाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन उत्साहात  

पारोळ्यात ग्रंथालय संघाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन उत्साहात  


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  ज्ञानसंवर्धन, वाचनसंस्कृती आणि ग्रंथालय चळवळीला नवे बळ देणारे नाशिक विभाग ग्रंथालय संघ व जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांचे संयुक्त वार्षिक अधिवेशन पारोळा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या अधिवेशनामुळे संपूर्ण शहरात ग्रंथप्रेमी आणि वाचनसंस्कृतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या अधिवेशनाचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्राचे संचालक अशोक गाडेकर होते. यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, देवगावचे आदर्श सरपंच समीर पाटील, नगरसेवक डॉ. शांताराम पाटील व छोटू पाटील, जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांच्यासह विविध जिल्ह्यांतील ग्रंथालय अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिवेशनाच्या निमित्ताने पारोळा शहरात रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. ग्रंथदिंडी काढून ग्रंथपूजन करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरपंच समीर पाटील, महेंद्र बोरसे, डॉ. शांताराम पाटील यांच्यासह मान्यवरांनी ग्रंथालय चालवताना येणाऱ्या अडचणी, समस्या आणि भविष्यातील संधी यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी आणि सतीश दशरथ पाटील यांनी केले.

ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयांच्या समस्या, प्रमुख मागण्या आणि वाचनसंस्कृतीच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

अधिवेशनाच्या दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कस्तुरी प्रकाशनचे गोकुळ बागुल सर व इंगळे मॅडम तसेच साप्ताहिक कुंभ विकास यांचे स्टॉल उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. स्नेहभोजनानंतर दुपारी २ ते ३ या वेळेत “वाचन संस्कृतीची आवश्यकता” या विषयावर प्रा. लिलाधर शिवाजी पाटील यांनी प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले.

या अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, जालना आदी जिल्ह्यांमधून ग्रंथालय क्षेत्रातील अधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह किशोर पाटील, सागर भगुरे, किरण बडगुजर, मनोज पाटील, दिगंबर पाटील, पी. बी. पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील, कविता पाटील, योगेश पाटील, दीपक पवार, सुकलाल पाटील यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील (चोपडा) यांनी केले, तर समारोपप्रसंगी पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या भव्य अधिवेशनाची सांगता झाली.


Protected Content

Play sound