जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स अंतर्गत राष्ट्रीय योगासन स्पर्धा सध्या अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. देशभरातील सर्वोत्तम खेळाडूंनी सादर केलेल्या योगकलेमुळे प्रेक्षक आणि पंच दोघेही भारावून गेले असून आर्टिस्टिक पेअर प्रकारात महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल प्रकारात पश्चिम बंगालने आघाडी घेतली असून आर्टिस्टिक ट्रेडिशनल प्रकारात सीआयएससी कौन्सील बोर्डचे खेळाडू प्रभावी कामगिरी करत पुढे आहेत. शरीर, श्वास आणि साधनेचा सुरेख समन्वय साधत खेळाडूंनी सादर केलेल्या योगासनांनी स्पर्धेला वेगळाच आयाम दिला आहे. आज या स्पर्धेतून अंतिम विजेते निश्चित होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या १७ वर्षांखालील गटातील या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी देशभरातून एकूण ३३ संघ जळगावात दाखल झाले आहेत. या स्पर्धेत १६७ खेळाडू सहभागी झाले असून त्यांनी आपली कला आणि शारीरिक संतुलनाचा अप्रतिम नमुना सादर केला आहे. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजित या स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर अशा चार प्रकारांमध्ये योगासनांचे सादरीकरण सुरू आहे.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय क्रीडा समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मुख्य पंच म्हणून डॉ. आरती पाल तर एसजीएफआयच्या मुख्य निरीक्षक म्हणून रितू पाठक काम पाहत आहेत. जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन, अजित घारगे, वरुण देशपांडे, किशोर सिंग सिसोदिया, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, अब्दुल मोहसीन, जयेश बाविस्कर, योगेश धोंगडे, मोहम्मद फजल, प्रवीण ठाकरे, कुलदीप राहुल निंभोरे, समीर शेख यांच्यासह संपूर्ण सहकारी संघ स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.



