
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर एक तरुण रक्ताळलेल्या अवस्थेत थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोहोचला. “जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही,” अशी भूमिका घेत या तरुणाने पोलीस ठाण्याच्या प्रांगणातच ठिय्या मांडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

अशी आहे घटना :
सत्यजित गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजितवर कौटुंबिक वादातून त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सत्यजितच्या हाताला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. मात्र, दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याऐवजी सत्यजितने न्यायाच्या मागणीसाठी थेट पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यातील ‘हायव्होल्टेज ड्रामा’ :
रक्तात माखलेल्या अवस्थेत सत्यजित पोलीस ठाण्यात शिरताच उपस्थित पोलीस कर्मचारी आणि नागरिक अवाक झाले. आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत, या मागणीसाठी त्याने आरडाओरडा करत प्रांगणातच ठाण मांडले. सत्यजितच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या दहशतीमुळे आणि संतापामुळे तो दवाखान्यात न जाता थेट पोलिसांकडे दाद मागण्यासाठी आला होता.
नातेवाईकांची मध्यस्थी आणि पुढील कारवाई :
बराच वेळ रक्त वाहत असल्याने सत्यजितची प्रकृती खालावू लागली होती. तो शुद्ध हरपण्याच्या स्थितीत असतानाही उपचारासाठी नकार देत होता. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच्या नातेवाईकांनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात कौटुंबिक वादाचे हिंसक वळण चर्चेचा विषय ठरले आहे.



