
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव (मोहाडी ग्रुप ग्रामपंचायत) येथे गटार व नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीच्या कथित दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांनी थेट तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत आपली कैफियत मांडली आहे.

दहिगाव परिसरातील गटार नाल्यांची मागील अनेक दिवसांपासून नियमित स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आलेली नाही, परिणामी सांडपाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरत आहे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केल्यास नागरिकांना पोलीस स्टेशनची धमकी दिली जाते व उडवाउडवीची उत्तरे मिळतात, त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही महिला असल्या तरी त्यांच्याकडून संवेदनशीलतेऐवजी दुर्लक्ष आणि कठोर वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामसेवक व सरपंच आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करत असून नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, तसेच नागरिकांचे अर्ज नोंदवून न घेणे, विकासकामांकडे दुर्लक्ष करणे आणि कागदपत्रांसाठी वारंवार पैशांची मागणी केली जाते, असेही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी नायब तहसीलदार अनिल पाटील, गटविकास अधिकारी पारोळा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली आहे.



