
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून त्यासंदर्भात महत्त्वाची सूचना महानगरपालिका प्रशासनाने जारी केली आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ अंतर्गत जळगाव शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक सभागृहे तसेच अंगणवाडीच्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांसाठी निश्चित करण्यात आलेल्या खोल्या निवडणूक कामकाजासाठी वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असल्याने प्रशासनाने संबंधित संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या सूचनेनुसार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांसाठी निश्चित केलेल्या वर्गखोल्या व परिसर रिक्त करून उपलब्ध करून द्याव्यात. या दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रांमध्ये आवश्यक ती किरकोळ तयारी व व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी खोली व परिसर अधिग्रहणासंदर्भात पत्र देण्यात आले होते, त्यानुसारच ही कार्यवाही करण्यात येत आहे.
सर्व शाळा व्यवस्थापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, सामाजिक सभागृहांचे व्यवस्थापक तसेच संबंधित संस्थांनी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांसाठी निश्चित केलेल्या खोल्या वेळेत उपलब्ध झाल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
ही सूचना जळगाव शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा निवडणूक अधिकारी शानेश्वर ढेरे यांनी दिली असून, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सर्वांनी जबाबदारीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



