Home Cities जळगाव प्रभाग ११ मध्ये ‘धनुष्यबाणा’चे जंगी शक्तीप्रदर्शन; महायुतीच्या उमेदवारांचा झंझावात प्रचार

प्रभाग ११ मध्ये ‘धनुष्यबाणा’चे जंगी शक्तीप्रदर्शन; महायुतीच्या उमेदवारांचा झंझावात प्रचार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण निर्माण केले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.

हनुमान चरणी नतमस्तक होऊन प्रारंभ :
म्युन्सीपल कॉलनीतील प्रसिद्ध मृत्यूंजय हनुमान मंदिरात महायुतीचे उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधूताई कोल्हे, माजी महापौर ललित कोल्हे आणि संतोष पाटील यांनी दर्शन घेऊन विजयाचा संकल्प केला. त्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने रॅलीला सुरुवात झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

जनतेशी थेट संवाद आणि स्वागत :
ही रॅली म्युन्सीपल कॉलनी, जुने भगवान नगर, अंबिका सोसायटी, मुंदडा नगर आणि भूषण कॉलनी या भागांतून काढण्यात आली. आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतः प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. ठिकठिकाणी महिलांनी रॅलीचे स्वागत करत आमदार भोळे आणि उमेदवारांचे औक्षण केले. यावेळी मतदारांच्या चेहऱ्यावरील उत्साह महायुतीसाठी जमेची बाजू ठरत आहे.

दिग्गज नेत्यांची मांदियाळी :
या प्रचार रॅलीमध्ये केवळ उमेदवारच नव्हे, तर पक्षाचे वरिष्ठ नेतेही मैदानात उतरल्याचे दिसले. माजी आमदार लताताई सोनवणे, माजी नगरसेवक नितीन बरडे, उज्ज्वलाताई बेंडाळे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. प्रभाग ११ मधील नागरी समस्या सोडवण्याचा आणि विकासाचा रथ पुढे नेण्याचा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. या मोठ्या शक्तीप्रदर्शनामुळे प्रभाग ११ मधील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Protected Content

Play sound