Home Cities अमळनेर निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी ; जनआंदोलन समितीची अधिकाऱ्यांशी सखोल...

निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी ; जनआंदोलन समितीची अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देत शासनाकडून प्राप्त निधी, झालेला खर्च तसेच बांधकामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. प्रकल्पाच्या गतीबाबत पारदर्शकता राहावी आणि शेतकरी व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.

निम्न तापी प्रकल्पाचा पाडळसरे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या अनुषंगाने जनआंदोलन समिती सातत्याने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. याच पार्श्वभूमीवर धरणाच्या बांधकामाची सद्यस्थिती, प्रत्यक्ष प्रगती, तांत्रिक बाबी तसेच पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते धरणावर उपस्थित झाले. समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, महेश पाटील, देविदास देसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी प्रत्यक्ष संवाद साधत काम कालबद्ध व गतिमान पद्धतीने होण्यासाठी असलेल्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता य. म. कडलक यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, धरणाच्या बांधकामात विविध टप्प्यांवर अनेक प्रक्रिया एकाचवेळी पूर्ण कराव्या लागतात, अन्यथा पाणी साठलेले दिसूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणी साठवणूक सुरू होईपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा देता यावा, या दृष्टीने नियोजनबद्ध काम सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसनाबाबतही आवश्यक त्या प्रक्रिया वेगाने राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या धरणाच्या कामात कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नसल्याचेही त्यांनी सांगितले. नदी वर्षातील सुमारे सहा महिने वाहत असल्याने कामासाठी मर्यादित कालावधी उपलब्ध होतो, तरीसुद्धा पूर्ण क्षमतेने बांधकाम सुरू आहे. पाडळसरे धरण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे गेट असलेल्या धरणांपैकी एक असून, अत्यंत बारकाईने व तांत्रिक अचूकतेने काम करावे लागत असल्याने वेळ लागतो, असेही त्यांनी नमूद केले. सध्या मनुष्यबळ कमी असले तरी लवकरच अतिरिक्त स्टाफ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत उपअभियंता भटूरकर यांच्या उपस्थितीत शासनाकडून प्राप्त व खर्च झालेल्या निधीची सविस्तर माहिती समितीला देण्यात आली.

याप्रसंगी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी समितीची सकारात्मक व समर्थनाची भूमिका मांडत प्रकल्पाच्या यशासाठी प्रशासनासोबत कायम सहकार्य राहील, असे सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार सुनिल पाटील यांनी मानले. या पाहणीवेळी भरतसिंग परदेशी, एन. के. पाटील, ॲड. कुंदन साळुंखे, डॉ. संजय पवार, रहेमतुल्ला पिंजारी, सुशिल भोईटे, प्रसाद चौधरी, सतीश काटे, डी. के. पाटील, प्रविण संदानशिव, पुरुषोत्तम शेटे, ज्ञानेश्वर वारुळे, दिनेश पाटील, गुलाब पाटील, मोहन तिलक, गौतम संदानशिव, रमेश चव्हाण, भगवान कोळी, माधव पाटील, सुपडु बैसाणे, नारायण बडगुजर, संजय सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता य. म. कडलक यांनी जनआंदोलन समितीच्या सकारात्मक भूमिकेबद्दल विशेष आभार मानले. अनेक ठिकाणी जनआंदोलन प्रकल्पांच्या विरोधात असतात, मात्र पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने सुरुवातीपासूनच धरण व प्रशासनाच्या पाठीशी उभे राहत सहकार्य केले, ही बाब अत्यंत दुर्मिळ व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound