Home Cities जळगाव प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवारांचा ‘वुमन पॉवर’चा जलवा !

प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवारांचा ‘वुमन पॉवर’चा जलवा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून, प्रभाग क्रमांक १६ मध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नाकी नऊ आणले आहेत. बुधवारी, ७ जानेवारी रोजी प्रभाग १६ ‘ब’ मधील अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि १६ ‘क’ मधील अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये झंझावाती प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला.

विकासाचा ‘रोडमॅप’ आणि थेट संवाद :
सकाळपासूनच दोन्ही उमेदवारांनी सावित्री नगर, सदोबा नगर, कालिंका माता नगर, हॅपी होम कॉलनी आणि जुना नशिराबाद रोड या भागांत पदयात्रा काढली. यावेळी उमेदवारांनी केवळ मते न मागता, ‘डोअर टू डोअर’ भेटी देऊन नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या जाणून घेतल्या. “आम्ही कोणत्याही राजकीय चौकटीत अडकलेले नाही, त्यामुळे आमचे पहिले प्राधान्य केवळ आणि केवळ प्रभागाचा विकास असेल,” असे आश्वासन हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी मतदारांशी संवाद साधताना दिले.

महिलांच्या समस्यांवर विशेष भर :
प्रचारादरम्यान दोन्ही महिला उमेदवारांनी महिला मतदारांशी भावनिक नातं जोडण्यावर भर दिला. पिण्याचे पाणी, पथदिवे आणि महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावेळी महिलांनी त्यांच्यासमोर मांडले. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देतानाच, “सेवेची संधी मिळाल्यास या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ठिकठिकाणी ज्येष्ठ महिलांनी या दोन्ही उमेदवारांचे औक्षण केले आणि त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला.

परिसरात परिवर्तनाची चर्चा :
साधारणपणे पक्षीय उमेदवारांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात, दोन्ही अपक्ष महिला उमेदवारांनी एकत्र येत केलेली ही मोर्चेबांधणी मतदारांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून या उमेदवारांकडे पाहिले जात असल्याने, प्रभाग १६ मध्ये यंदा मोठे परिवर्तन घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रचार दौऱ्यात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.


Protected Content

Play sound