Home Cities जळगाव ‘त्या’ अपक्ष उमेदवाराचा भाजपशी काहीही संबंध नाही : दिपक सुर्यवंशी

‘त्या’ अपक्ष उमेदवाराचा भाजपशी काहीही संबंध नाही : दिपक सुर्यवंशी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात महायुती विरुद्ध बंडखोर असा संघर्ष आता पेटला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नावाचा वापर करून काही अपक्ष उमेदवार मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, अशा बंडखोर उमेदवारांचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संबंध नाही.

महायुतीचे अधिकृत उमेदवार जाहीर :
दिपक सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, प्रभाग १३ मध्ये महायुतीने आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यात १३ ‘अ’ मधून नितीन प्रभाकर सपके (भाजप), १३ ‘ब’ मधून सौ. सुरेखा नितीन तायडे (भाजप) आणि १३ ‘ड’ मधून प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस) हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, १३ ‘क’ गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बंडखोरांवर कारवाईची टांगती तलवार :
पक्षाने सूचना देऊनही ज्या इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही आणि जे आता अपक्ष म्हणून लढत आहेत, त्यांच्यावर भाजप नेतृत्व संतापले आहे. हे उमेदवार प्रभागात आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून मतदारांची फसवणूक करत आहेत. यावर सुर्यवंशी यांनी कडक शब्दांत ताकीद दिली आहे की, “येत्या दोन दिवसात या उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आणि पक्षादेशाचे उल्लंघन सुरूच ठेवल्यास त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”

मतदारांना आवाहन :
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ ‘कमळ’ आणि ‘घड्याळ’ या चिन्हांवर लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन सुर्यवंशी यांनी केले आहे. मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, अशी विनंतीही त्यांनी या पत्रकाद्वारे केली आहे. या स्पष्टोक्तीमुळे प्रभाग १३ मधील राजकीय संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound