Home राजकीय छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला


छत्रपती संभाजीनगर-वृत्तसेवा । महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली असून एमआयएमचे राष्ट्रीय नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएममधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञातांनी धारदार शस्त्राने वाहनावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हा हल्ला एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांकडूनच झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून नव्या लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी वाढली आणि त्यातूनच हा संताप उफाळून आल्याचे बोलले जात आहे.

हल्ल्यापूर्वी नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. घटनेनंतर जलील यांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी वातावरण अजूनही तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वीच जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी जलील यांना घेराव घातला असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच एमआयएममधील गटबाजी आणि अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आल्याने या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound