
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारितेच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी भुसावळ येथे पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भुसावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला, ज्यामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दि. ६ जानेवारी, मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आयोजित या सन्मान सोहळ्यात विविध माध्यमांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजप्रबोधन, लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून पत्रकारांनी दिलेल्या योगदानाचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला. सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेमुळेच लोकशाही अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध आघाडी व मोर्चाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंतराव माहुरकर, सागर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पत्रकारांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करणे तसेच लोकहिताचे विषय निर्भीडपणे मांडणे, ही पत्रकारांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या कार्यामुळेच लोकशाही व्यवस्था अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनते, असेही त्यांनी सांगितले.
या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार बांधवांना प्रोत्साहन मिळाले असून भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याचा निर्धार यावेळी अनेकांनी व्यक्त केला. भुसावळ तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत हा दिवस उत्साहात साजरा केला.



