Home Cities जळगाव मैत्र महोत्सवात ‘आईना’ने प्रेक्षकांना खळखळून हसवले

मैत्र महोत्सवात ‘आईना’ने प्रेक्षकांना खळखळून हसवले


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्र महोत्सव जळगावच्या सांस्कृतिक विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. विविध कलात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा आणि आनंददायी अनुभव देत असून, तिसऱ्या दिवशी रसिकांनी “उत्तम दर्जाच्या कलाकृतींची पर्वणी मिळत आहे,” अशी भावना व्यक्त केली.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, अभियंता पतसंस्थेचे साहेबराव पाटील, रंगकर्मी पियुष रावळ, मैत्र महोत्सवाचे प्रमुख प्रकाश पाटील, शिरीष बर्वे, विनोद पाटील, कार्यक्रम प्रमुख नारायण बाविस्कर व अक्षय नेहे उपस्थित होते. यावेळी सोशल मीडियावर विशेष प्रभाव निर्माण करणारे इन्फ्लुएन्सर गणेश पाटील यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन मंगेश कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. अनुराधा वाणी यांनी मैत्र महोत्सवाविषयी आपल्या भावना व्यक्त करत परिवर्तनच्या या उपक्रमामुळे कलेशी नाते जोडण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे यांनीही हा महोत्सव अत्यंत सकारात्मक अनुभव असल्याचे नमूद करत परिवर्तनसोबत रसिक सदैव उभे राहतील, अशी भावना व्यक्त केली.

यानंतर अहिराणी बाजातील मराठी दीर्घांक ‘आईना’ सादर करण्यात आला. आरशाभोवती गुंफलेल्या कथानकातून समाजजीवनातील विविध पैलू विनोदी शैलीत मांडण्यात आले. कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि मोठी दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीला भोलाणे यांनी केले. दरम्यान, उद्या महोत्सवात कणकवली येथील ‘आइतवार’ हे नाटक सादर होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता भाऊंचे उद्यान येथे होणार असून, तो सर्वांसाठी खुला आहे.


Protected Content

Play sound