अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघावर दणदणीत विजय मिळवला. खेळाच्या माध्यमातून पोलीस व पत्रकारांमधील सलोखा आणि मैत्री अधिक दृढ झाली.

नाणेफेक जिंकून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम आणि पोकॉ प्रल्हाद सूर्यवंशी मैदानात उतरले. पत्रकार संघाकडून आर. जे. पाटील यांनी निकम यांची महत्त्वपूर्ण विकेट घेत पोलीस संघाला सुरुवातीचा धक्का दिला. मात्र त्यानंतर प्रल्हाद सूर्यवंशी यांनी आक्रमक फलंदाजी करत सामना आपल्या ताब्यात घेतला. पीएसआय समाधान गायकवाड यांनी ४९ धावांची मोलाची साथ दिली. चौफेर फटकेबाजी करत सूर्यवंशी यांनी नाबाद ८२ धावा केल्या आणि पोलीस संघाने १६८ धावांचा भक्कम डोंगर उभारला.

१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पत्रकार संघाकडून महेंद्र पाटील आणि उमेश काटे यांनी सावध सुरुवात केली. त्यानंतर आर. जे. पाटील, प्रविण बैसाणे, मुन्ना शेख, राहुल भदाणे, किरण पाटील, निरंजन पेंढारे, गणेश चव्हाण, कमलेश वानखेडे व रिजवान मणियार यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र पोलीस संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि भेदक मारा करत पत्रकार संघाची फलंदाजी कोलमडून टाकली. डीवायएसपी विनायक कोते, पीआय दत्तात्रेय निकम, पो.कॉ. शेखर साळुंखे, मंगल भोई, मयूर पाटील, विनोद संदानशिव व चरण पाटील यांच्या अचूक गोलंदाजीसमोर पत्रकार संघ अपयशी ठरला आणि पोलीस संघाने सामना आपल्या नावावर केला.
उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रल्हाद सूर्यवंशी यांना **‘मॅन ऑफ द मॅच’**, अचूक गोलंदाजीसाठी राहुल पाटील यांना **‘उत्कृष्ट गोलंदाज’**, तर शानदार कॅचसाठी मंगल भोई यांचा गौरव करण्यात आला. सामन्यापूर्वी क्रिकेट प्रशिक्षक रिंकू पवार यांनी दोन्ही संघांना खेळाचे नियम समजावून सांगितले.
या मैत्रीपूर्ण सामन्याला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचे कौतुक करून उत्साह वाढवला. पंच म्हणून एस.पी. वाघ, रिंकू पवार, सुफियान तेली व सय्यद अबुजर यांनी काम पाहिले. श्लोक बागुल यांनी स्कोअरर म्हणून तर संजय पाटील यांनी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी सपोनि जीभाऊ पाटील, फिरोज बागवान, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, सुरेश कांबळे, प्रा. डॉ. विजय गाढे, नूर खान, आत्माराम अहिरे, मिलिंद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धांत सिसोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस व पत्रकार बांधव उपस्थित होते.



