
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टरमध्ये नळीने डिझेल भरत असताना अचानक तोंडातून पोटात इंधन गेल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथे घडली आहे. या घटनेत गंभीर बाधा झालेल्या सलीम गुलाब तडवी (वय ३४) या तरुण चालकाचा चार दिवसांच्या उपचारानंतर रविवारी, ४ जानेवारी रोजी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अशी आहे घटना :
मयत सलीम तडवी हे आपल्या कुटुंबासह पिंप्री फत्तेपूर येथे वास्तव्याला होते. ते पेशाने चालक असून ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत होते. कॅनमधून डिझेल ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी त्यांनी नळीचा वापर केला. नळीने डिझेल तोंडाने ओढत असताना दाबाने अचानक डिझेल त्यांच्या पोटात गेले.
उपचारादरम्यान मृत्यू:
डिझेल पोटात गेल्याने सलीम यांची प्रकृती तत्काळ खालावली. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विषबाधा पसरल्याने रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
कुटुंबाचा आधार हरपला:
सलीम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. घराचा कमावता तरुण गेल्याने तडवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सकाळी ९ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



