
मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सुमारे साडेतीन दशकांच्या सेवेनंतर आज निवृत्ती स्वीकारली. नायगाव पोलिस मैदानावर झालेल्या समारंभात त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत निरोप देण्यात आला. १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्याचे सांगितले.

निवृत्ती समारंभात त्यांनी संपूर्ण पोलिस दलाचे आभार मानत, गेल्या दोन वर्षांत सण-उत्सव तसेच निवडणुका शांततेत पार पडल्याचे नमूद केले. गडचिरोली आणि गोंदिया भागात नक्षलवादविरोधी कारवाईला मिळालेले यश हे सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रश्मी शुक्ला यांच्या सेवाकाळात काही वादही उद्भवले. पूर्वीच्या सरकारच्या काळात त्यांच्यावर आरोप झाले होते, मात्र नंतर परिस्थितीत बदल झाल्यावर ते प्रकरण मागे पडले. निवडणूक काळात त्यांच्या बदलीचा निर्णयही झाला होता; परंतु पुढील काळात त्यांची पुन्हा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचे आणि शिस्तबद्ध कामगिरीचे कौतुक करत, राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलाच्या नेतृत्वाची सूत्रे आता १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे देण्यात आली आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दाखवलेल्या शौर्यामुळे ते विशेष ओळखले जातात. एनआयए, एटीएस तसेच मुंबई पोलिसांतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही त्यांनी नेतृत्व केले होते.
डिसेंबर २०२७ पर्यंत असलेल्या कार्यकाळात सायबर गुन्हे, दहशतवादविरोधी तयारी आणि पोलिस दलाचे आधुनिकीकरण ही प्रमुख आव्हाने दाते यांच्यासमोर असणार आहेत. अनुभव आणि प्रत्यक्ष कारवाईचा ठसा यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलिस दल अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



