मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांसाठी मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी आणि शिक्षकांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे शिक्षक संघटना आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या शाळांमध्ये विविध स्पर्धा, घटक चाचण्या, विज्ञान प्रदर्शन तसेच दहावी-बारावीच्या पूर्वपरीक्षांची तयारी सुरू आहे. अशा महत्त्वाच्या काळात शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कामांमध्ये गुंतविल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल, असा आक्षेप शिक्षकांकडून घेतला जात आहे.

विद्यार्थ्यांचे पालक शशिकांत पवार यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. तर महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष नीलेश भामरे यांनी सांगितले की, निवडणूक कामे, आधार अपडेट, बँक डिटेल्स तपासणी, बीएलओसह विविध शासकीय कामांचा भार आधीच शिक्षकांवर आहे. त्यात नव्याने ही जबाबदारी आल्याने अध्यापनासाठी वेळ कधी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, गट शिक्षणाधिकारी परशराम महाले यांनी वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाचे पालन करणे कर्तव्य असल्याचे सांगत, मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक देण्याच्या सूचनांनुसार हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षक संघटना व पालकांकडून करण्यात येत आहे.



