Home क्राईम सात जिल्ह्यांत घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा ‘बंटी’ जेरबंद

सात जिल्ह्यांत घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा ‘बंटी’ जेरबंद


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धुळे अशा तब्बल सात जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोड्या करून पोलिसांच्या नाकी नऊ आणणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु. ता. चिखली, जि. बुलढाणा) असे या सराईत चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

घटनाक्रम आणि तपास:
गेल्या ३ डिसेंबर २०२५ रोजी पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोंडापूर आणि पहूर या गावांमध्ये अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोड्या केल्या होत्या. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पहूर पोलिसांचे एक संयुक्त विशेष तपास पथक नेमले होते.

सापळा आणि अटक:
तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले होते. या तपासात किशोर वायाळ याचे नाव समोर आले. मात्र, हा आरोपी अत्यंत सराईत असून तो कधीही एका ठिकाणी वास्तव्यास राहत नसे. तो सतत आपली ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना चकवा देत होता. पथकाने सलग दोन दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्याचा मागावर राहून अखेर त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

गुन्ह्यांची कबुली आणि मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पहूरमधील दोन घरफोड्यांसह जामनेर आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील ३ अशा एकूण ५ मोठ्या घरफोड्यांची कबुली दिली. त्याने चोरलेले सोने संभाजीनगर आणि चिखली परिसरात विकल्याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून तो मुद्देमाल हस्तगत केला. या अटकेमुळे अनेक जिल्ह्यांतील घरफोडीच्या गुन्ह्यांची साखळी उघडकीस आली असून, आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound