
मुंबई–वृत्तसेवा । हिंदी भाषिक उत्तर भारतीयच यंदा मुंबईचा महापौर होईल, अशी वल्गना भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज तीव्र आणि जळजळीत प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले की, भाजपने जाणीवपूर्वक अमराठी महापौर बनवण्याचा अजेंडा आखला असून, त्याची जबाबदारी कृपाशंकर सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह हा भाजपचा ‘बोलका पोपट’ असून त्याचे विधान हे चुकून किंवा भावनेच्या भरात आलेले नाही, तर पूर्णपणे ठरवून केलेले आहे. भाजप सध्या चाचपणी करत असून, मराठी समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे, असा आरोप राऊतांनी केला. मुंबईतील मराठी माणसाला डिवचण्याचा आणि त्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या मुद्द्यावर बोलताना राऊतांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचाही उल्लेख करत टीका अधिक तीव्र केली. आज कृपाशंकर सिंह बोलतोय, उद्या योगी आदित्यनाथ, सम्राट चौधरी यांसारखे नेतेही मैदानात उतरतील, असा इशारा देत भाजपला केवळ परप्रांतीयांची मते मिळवायची आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपचा काहीही संबंध नव्हता, तरीही आज सत्तेत बसून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. मराठी माणसाच्या तोंडावर पान खाऊन पिचकारी मारण्याचं काम कृपाशंकर सिंहकडून करून घेतलं जात आहे, असे तिखट शब्द वापरत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.
याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, हे आरोप नाहीत, हे सत्य आहे. राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाला काही नियम आणि संकेत असतात. राजकीय कार्यक्रमांपासून त्यांनी अलिप्त राहायला हवे; मात्र कमळाचे उपरणे घालून आपल्या घरातील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ते गेले आणि तिथे विरोधकांना धमकावले, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा संयुक्त जाहीरनामा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही राऊतांनी दिली. उद्या संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होईल. संयुक्त सभा सर्वत्र होतील. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्याच्या कामात सक्रिय आहेत, असे त्यांनी सांगितले. मीरा-भाईंदर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत संयुक्त सभा आयोजित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर टीका करताना राऊतांनी आर्थिक व्यवहारांवरही खळबळजनक आरोप केले. एबी फॉर्मसोबत भाजप पाच कोटी रुपये देत आहे, तर शिंदे गट दहा कोटी रुपये देत आहे, असा दावा त्यांनी केला. सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारीसाठी खुलेआम पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत, आमच्या पक्षातील काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असतील, पण त्यांनी तमाशे केले नाहीत आणि काहींनी वेळेत अर्ज मागे घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या रणनीतीवर आणखी टीका करत राऊत म्हणाले की, भाजपने काही ठिकाणी मुस्लिम उमेदवारही दिले आहेत; राणे पुत्रांना सांगा, आता यावर काय भूमिका घेणार, असा चिमटाही त्यांनी काढला. भाजपचा संपूर्ण प्रयत्न समाजात फूट पाडण्याचा असून निवडणुकीत त्याचा फायदा करून घेण्याचा आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अस्मिता, भाषा आणि स्थानिक हक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी राहील आणि याच मुद्द्यावर भाजपविरोधात जोरदार लढा उभा केला जाईल, असा स्पष्ट इशाराच संजय राऊत यांनी दिला.
कृपाशंकर सिंह यांच्या ‘अमराठी महापौर’ विधानामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा तापला आहे. संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल करत मराठी अस्मिता, भाषा आणि स्थानिक हक्कांचा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा इशारा दिला आहे.



