जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सांस्कृतिक विश्वात उत्साहाची नवी पहाट उगवणार असून भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन व परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मैत्र महोत्सव’ आज, १ जानेवारीपासून भाऊंचे उद्यान येथे सुरू होत आहे. रोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या महोत्सवात नृत्य, नाट्य, साहित्य आणि संगीत अशा विविध कला प्रकारांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने साकारलेल्या या महोत्सवाचा पहिला दिवस खास रंगतदार ठरणार असून ‘जिना यहा मरना यहा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अनिश शहा व नंदलाल गादिया यांची असून निर्मिती प्रमुख म्हणून हर्षल पाटील व मंजुषा भिडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कलाकार प्रवीण माळी यांचा ‘आयत पोयत सख्यान’ हा धमाल विनोदी एकपात्री प्रयोग रसिकांचे मनोरंजन करणार आहे. तिसऱ्या दिवशी पुणे येथील ‘आईना’ हे नाटक सादर होणार असून आधुनिक विषय मांडणीमुळे या नाटकाबाबत उत्सुकता आहे.
चौथ्या दिवशी कोकणातील ‘आईतवार’ हे नाटक सादर केले जाणार आहे, तर पाचव्या दिवशी विविध विषयांवर आधारित चर्चा आयोजित करण्यात आली आहे. सहाव्या दिवशी ‘जर्नी ऑफ डान्स’ हा विशेष कार्यक्रम जागृती भिडे व परिवर्तनचे कलावंत सादर करणार असून नृत्यप्रेमींना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.
सातव्या दिवशी भुसावळ येथील ‘या प्रश्नाला उत्तर नव्हते’ हे नाटक रंगमंचावर येणार आहे. आठव्या व शेवटच्या दिवशी ‘रुमी और हिंदुस्तान’ हा परिवर्तन निर्मित कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमाची संकल्पना अनिल कांकरिया व अमर कुकरेजा यांची आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांनी केले असून निर्मिती प्रमुख म्हणून छबिराज राणे व किरण बच्छाव कार्यरत आहेत.
हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी खुला असून जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन महोत्सव प्रमुख डॉ. रेखा महाजन, आर्कि. शिरीष बर्वे, प्रकाश पाटील, नंदूभाई अडवाणी, विनोद पाटील, पारस राका, स्वरूप लुंकड आणि मानसी गगडाणी यांनी केले आहे.
एकूणच नववर्षाच्या प्रारंभाला जळगावात कला, संस्कृती आणि विचारांचे समृद्ध दर्शन घडवणारा ‘मैत्र महोत्सव’ रसिकांसाठी आठवणीत राहणारा ठरण्याची शक्यता आहे.



