Home क्राईम भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये खळबळ; ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा

भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये खळबळ; ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा

0
175

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना मंगळवारी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अन्नातून भीषण विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्व बाधित कर्मचाऱ्यांना तातडीने रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मध्यरात्री उडाली तारांबळ
भुसावळ शहरातील आर.पी.डी. परिसरात असलेल्या रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोकोपायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड आणि तिकीट तपासणी कर्मचारी अशा विविध पदांचे प्रशिक्षण सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक अनेक प्रशिक्षणार्थींना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. अवघ्या काही वेळातच बाधितांचा आकडा ८० पर्यंत पोहोचल्याने प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण पसरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केल्या आणि सर्व बाधितांना रेल्वे रुग्णालयात हलवले.

प्रकृती स्थिर असल्याची माहिती
या घटनेबाबत माहिती देताना सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष व्ही. के. समाधीया यांनी सांगितले की, “मध्यरात्री विषबाधेचा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सध्या सर्व ६० ते ८० कर्मचाऱ्यांवर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.”

जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मेसमध्ये देण्यात आलेल्या अन्नामुळेच ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी आजारी पडल्याने रेल्वेच्या आरोग्य विभागाची मोठी तारांबळ उडाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता कामगार संघटनांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound