यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने आपला संघटनात्मक डाव अधिक मजबूत करत गटनेतेपदाची घोषणा केली असून नगरसेविका सौ. नंदा राजेंद्र महाजन यांची गटनेतेपदी, तर माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांची उपगटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपालिकेतील भाजपच्या राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.
यावल नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केले. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचे ८ नगरसेवक निवडून आल्याने भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे नगरपालिकेतील गटनेतेपदावर कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

गटनेतेपदासाठी दोन नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सौ. नंदा राजेंद्र महाजन यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली. तर नगरपालिकेतील अनुभव लक्षात घेता, काही काळ प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेले व विद्यमान नगरसेवक असलेले राकेश मुरलीधर कोलते यांची उपगटनेतेपदी वर्णी लागली.
या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या वतीने दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आहे. नगरपालिकेत भाजप हा सर्वात मोठा गट असल्याने आगामी काळात प्रभावी भूमिका बजावण्याची जबाबदारी नव्या नेतृत्वावर असणार आहे.
नव्या गटनेतृत्वाकडून शहराच्या विकासासाठी सकारात्मक आणि आक्रमक भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त होत असून यावल नगरपालिकेच्या राजकारणात भाजप अधिक सक्षमपणे पुढे येईल, असे संकेत या निवडीमुळे मिळत आहेत.



