Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगरमध्ये पाईपलाईनशिवाय रस्ते खोदून खड्डे बुजवले, नगरपंचायत व नगरसेवकांची उदासीनता उघड

मुक्ताईनगरमध्ये पाईपलाईनशिवाय रस्ते खोदून खड्डे बुजवले, नगरपंचायत व नगरसेवकांची उदासीनता उघड

0
164

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेच्या अंमलबजावणीबाबत मुक्ताईनगरमध्ये गंभीर अनागोंदी समोर आली असून विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुरू असलेल्या कामांमुळे अमृत योजनेचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून रस्ते खोदण्यात आले. या कामादरम्यान अनेक नागरिकांच्या घरगुती पाईपलाईनचे नुकसान झाले, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, एवढा गोंधळ घालूनही प्रत्यक्षात एकही नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. काम अर्धवट अवस्थेत सोडून केवळ खड्डे बुजवण्यात आल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला आहे.

या सर्व प्रकारात नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित प्रभागाचे नगरसेवक पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. काम सुरू असताना कोणतीही देखरेख न झाल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचे स्पष्ट होत असून, लोकप्रतिनिधी मात्र मूकदर्शक बनल्याचा संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत की, जर पाईपलाईनचे काम रद्द करण्यात आले असेल तर नगरपंचायतीने याबाबत अधिकृत घोषणा का केली नाही. प्रभागातील रस्ते खोदून नागरिकांचे नुकसान होत असताना नगरसेवकांनी हस्तक्षेप का केला नाही, तसेच वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे.

अमृत योजनेच्या नावाखाली सुस्थितीत असलेले डांबरी रस्ते फोडण्यात आले आणि कोणतीही पाईपलाईन न टाकता तेच रस्ते घाईघाईने बुजवण्यात आले. यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली असून येत्या काळात अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या नुकसानाची जबाबदारी नगरपंचायत घेणार की संबंधित नगरसेवक, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

मूलभूत सुविधांच्या कमतरतेने आधीच त्रस्त असलेला प्रभाग क्रमांक 13 आता प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी अडचणीत सापडला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा गोंधळ म्हणजे जनतेच्या कररूपाने भरलेल्या पैशांचा अपव्यय नसून काय, असा रोष व्यक्त होत आहे.

नगरपंचायत प्रशासन व संबंधित नगरसेवकांनी तातडीने या प्रकरणावर खुलासा करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रकाराची दखल केव्हा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound