Home Cities जामनेर जामनेरमध्ये जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ

जामनेरमध्ये जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरात साहित्य, संस्कृती आणि युवकांच्या सर्जनशीलतेचा संगम घडवणाऱ्या दोन दिवशीय जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सांस्कृतिक मंडळ जामनेरतर्फे आयोजित या संमेलनाची पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने मंगलारंभ करण्यात आला असून शहरात साहित्यिक वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ग्रंथदिंडीचे विधीवत पूजन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी शहरातून काढण्यात आली. साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. हातात ग्रंथ घेऊन साहित्याचा जागर करणारी ही दिंडी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

या प्रसंगी जे. के. चव्हाण, प्राध्यापक फुला बागुल, एम. सु. पगारे, बी. एन. चौधरी, अमृत यात्री, डी. डी. पाटील, प्राध्यापक एस. आर. महाजन, गोरख सूर्यवंशी यांच्यासह अनेक साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी साहित्य चळवळ युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी दिवसभर विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलन, लोककवयित्री बहिणाबाईंचा परिचय, कथाकथन अशा वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम होणार असून युवकांना अभिव्यक्तीची संधी मिळणार आहे. साहित्य, संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण घडवणारे हे संमेलन जामनेरसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनामुळे जामनेरमध्ये साहित्यिक चैतन्य निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विचार, शब्द आणि संस्कृतीचा उत्सव रंगणार आहे.


Protected Content

Play sound