Home Cities यावल दोन दिवसांत होणार यावल भाजप गटनेत्याचा फैसला ; आमदारांच्या कोर्टात चेंडू

दोन दिवसांत होणार यावल भाजप गटनेत्याचा फैसला ; आमदारांच्या कोर्टात चेंडू

0
168


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व कामगिरी करत स्थानिक राजकारणात इतिहास घडवला आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने ८ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा गट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष गटनेता निवडीकडे लागले असून, याचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर राकेश मुरलीधर कोलते, रुबाब महमंद तडवी, कल्पना दिलीप वाणी, हेमराज जगन्नाथ फेगडे, योगेश विजय चौधरी, सविता विजय नन्नवरे, शुभांगी रोशन येवले आणि नंदा राजेंद्र महाजन या ८ उमेदवारांनी विजय मिळवून पालिकेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राकेश कोलते आणि कल्पना वाणी या अनुभवी नेत्यांनी दुसऱ्यांदा पालिकेत एन्ट्री केली असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे.

गटनेतेपदासाठी रस्सीखेच
नगरपालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने गटनेतेपद अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि पालिकेतील सत्ता समीकरणांवर लक्ष केंद्रित करून गटनेता निवडला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या गटनेतेपदासाठी दोन प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याचा सस्पेन्स कायम आहे.

आमदारांच्या निर्णयाकडे लक्ष
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी गटनेता निवडीची सूत्रे आमदार अमोल जावळे यांच्याकडे दिली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत आमदार जावळे नगरसेवकांशी चर्चा करून गटनेत्याचे नाव अधिकृतपणे जाहीर करतील. या निवडीनंतर पालिकेच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


Protected Content

Play sound