अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरणारी बातमी म्हणजे कवी व गझलकार शरद धनगर यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. खान्देशातील साहित्यिक चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या निवडीमुळे परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिनांक १ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित साहित्य संमेलनात शरद धनगर यांना गझल सादरीकरणासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. येथील गझल कट्टा मंचावर ते आपली निवडक गझल रसिकांसमोर सादर करणार असून, तरन्नूम विशेष मुशायऱ्यात त्यांच्या सादरीकरणाचा समावेश आहे.

दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा विशेष मुशायरा संपन्न होणार आहे. शरद धनगर हे केवळ कवी व गझलकारच नाहीत, तर खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्याचा ठसा खान्देशापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे.
यापूर्वी शरद धनगर यांनी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभाग नोंदवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच राज्यातील विविध साहित्य संमेलने, कविसंमेलने आणि मुशायऱ्यांमध्ये त्यांना सातत्याने निमंत्रित केले जाते.
राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली असून, साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना अहिराणी कविता सादर करण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या लेखनातून खान्देशी बोलीभाषा, संवेदना आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले जाते.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्यासह अनेक साहित्यिक, मान्यवर आणि रसिकांनी शरद धनगर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खान्देशच्या साहित्यिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सातारा साहित्य संमेलनातील शरद धनगर यांचे गझल सादरीकरण रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता असून, त्यांच्या निवडीमुळे खान्देशच्या साहित्यिक योगदानाचा गौरव होणार आहे.



