Home Cities मुक्ताईनगर जिल्हा परिषद शाळा कोठे येथे बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद शाळा कोठे येथे बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
144


मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठे येथे आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी उपक्रम राबविण्यात आले. शिक्षणासोबतच खेळ, करमणूक आणि सामाजिक सहभाग यांचा संगम साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात आला. रंगीबेरंगी वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमांमुळे शाळा परिसर आनंदाने फुलून गेला होता. मेळाव्यानंतर प्रथमच पालकांसाठीही मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. बलून गेम, संगीत खुर्ची यांसारख्या खेळांमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक व भौतिक सुधारणा, स्वच्छता, अध्यापनातील सकारात्मक बदल तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. शाळेतील बदल प्रत्यक्ष पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनीही शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची भूमिका स्पष्ट केली. लवकरच लोकवर्गणी गोळा करून आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे तसेच किरकोळ भौतिक दुरुस्त्या करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. या सहकार्यामुळे शाळेच्या प्रगतीला अधिक गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी “आमची शाळा – छोटी शाळा, सुंदर शाळा” या घोषणेनिशी सर्वांनी शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकजुटीचा संकल्प केला. बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून शाळा, पालक आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


Protected Content

Play sound