Home आरोग्य धरणगावात सिकलसेल सप्ताहाचा जागर; विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

धरणगावात सिकलसेल सप्ताहाचा जागर; विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

0
132

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या राज्यभर राबवल्या जाणाऱ्या ‘सिकलसेल सप्ताहा’चे औचित्य साधून, धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात सिकलसेल या आजाराबाबत सखोल जनजागृती करून विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली.

सिकलसेल हा एक गंभीर अनुवांशिक आजार असून, त्याची वेळीच ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. हीच गरज ओळखून या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांनी सिकलसेलची लक्षणे, या आजारामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक समस्या आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर विस्तृत भाष्य केले. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले. त्यानंतर प्रत्यक्ष रक्त तपासणी मोहिमेला सुरुवात झाली, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या आरोग्य मोहिमेसाठी धरणगाव शहरातील ‘शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ आणि ‘आपला दवाखाना’ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव व डॉ. तुषार मेढे यांनी विशेष परिश्रम घेतले. तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी सिकलसेल तालुका समन्वयक सौ. योगिता सोनार, महालॅबच्या तंत्रज्ञ सोनल बीसेन, भदाने सिस्टर (ANM), सुरेखा वसावे (GNM) तसेच मयूर पाटील, प्रशांत शिंदे, विकास पाटील आणि आदित्य पाटील या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. सिकलसेल आजाराबद्दलची भीती घालवून त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी करण्यात आले.


Protected Content

Play sound